You are hereBlogs / NEOMM's blog / महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन!

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन!


By NEOMM - Posted on 15 September 2015

नमस्कार!
सर्व मराठी मंडळांची गणेशोत्सवाची तयारी जोरात चालू असेल. सर्वांना एकत्र आणणारा, महाराष्ट्रीय परंपरेची जपणूक करणारा हा उत्सव जल्लोषात साजरा करत असतांना, यंदा मात्र एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आहे. ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रात पडलेला भीषण दुष्काळ! यंदा महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागात गेल्या ५० वर्षांतील सर्वाधिक हानिकारक दुष्काळ असून पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याच्या टंचाईची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. गरीब शेतकरी पुरता उद्‌ध्वस्त झाला आहे. सततची नापिकी, वाढत जाणारे कर्ज, दररोजचा संसार चालविण्यासाठी येणाऱ्या अडचणी याला कंटाळून गेल्या २ वर्षांत १०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या आहेत. त्यांचे कुटुंबीय आज अक्षरश: उघड्यावर पडले आहेत.

महाराष्ट्र शासनच नव्हे तर ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी ह्या दुष्काळग्रस्त लोकांना मदतीचा हात देण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. कदाचित तुमच्या वाचनात आले असेल, की अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीला धावून आले आहेत आणि 113 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी आर्थिक मदत मिळवून दिली आहे. तसेच हे अरिष्ट टाळण्यासाठी दानशुरांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
महाराष्ट्राशी आपली नाळ जपणारी अनेक मराठी मंडळी महाराष्ट्राबाहेर- उत्तर अमेरिकेत आहेत. मराठी मातीतून आपण मोठे झालो आहोत आणि ह्या मातीशी सगळ्यात जवळचं नातं शेतकऱ्यांच आहे. तेव्हा महाराष्ट्रातील या शेतकऱ्यांना सध्याच्या हलाखीच्या परिस्थितीत मदतीचा हातही आपण पुढे करावयांस हवा. त्यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळ कार्यकारिणी उत्तर अमेरिकेतील विविध मंडळांना निधीसंकलनाचे आवाहन करीत आहे. उत्तर अमेरिकेतील विविध मंडळांकडून असा संकलित निधी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या पुढाकाराने, एकत्रितपणे आणि योग्य संस्थेमार्फत महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांपर्यंत पोहोचेल, याची काळजी निश्चित घेतली जाईल. निधीसंकलनाकरिता काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा मानस आहे. त्याची सविस्तर माहिती (fund raising plan) लवकरच पाठवू.
आपल्या मंडळाच्या गणेशोत्सवाच्या आरतीला बाप्पा समोर जो निधी जमतो तो बहुतेक सर्व मंडळे धार्मिक किंवा सामाजिक संस्थांना देणगी स्वरूपात देतात. यंदा ती सर्व दक्षिणा आपण आपल्या महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिली तर ते एक पुण्यकर्मच होईल असा आमचा विश्वास आहे. जनसेवा हीच ईश्वरसेवा ही शिकवण आपल्या परंपरेने आपल्याला दिली आहे तरी ह्या कार्यात सर्व मराठी मंडळांचे सहकार्य मिळेल ही आशा! ह्या व्यतिरिक्त आपल्या मंडळाच्या सभासदांना वैयक्तिक स्वरूपाची आर्थिक मदत पाठवायची असल्यास आमच्याशी जरूर संपर्क साधा.

धन्यवाद!

बृहन्महाराष्ट्र मंडळ कार्यकारिणी (२०१५-२०१७)

Contact Us

NEOMM Constitution

Download[PDF]. Updated in 2005. Opens in a new browser window.