नमस्कार,
म्हणता म्हणता २०२४ चे अर्धे वर्ष सरले. गेल्या चार महिन्यात आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत करून आपल्या समोर दर्जेदार कार्यक्रम आणले.
क्लीव्हलँडच्या इतिहासात प्रथमच मंदार भिडे ह्यांचा मराठीत स्टँड-अप कॉमेडी शो आपण आयोजित केला. मंदारचा शो शुभ मंगल सावधान हा विवाह, वैवाहिक जीवन, आपली मुले, त्यात आपल्या पालकांची भूमिका आणि हे सर्व कसे छान आणि आनंददायी असू शकते यावर विनोदी भाष्य होते.
दुसरा महत्वाचा कार्यक्रम म्हणजेच गुढी पाडवा. ह्या वर्षी पहिल्यांदाच आपण पंगत भोजनाचा आस्वाद घेतला. केळीच्या पानावरचे ते सुग्रास जेवण, उभारलेली सुबक गुढी आणि पारंपरिक पोशाखांनी खरंच त्या कार्यक्रमाला रंगात आली.
मे महिन्यात आपण महाराष्ट्राची जत्रा ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला क्लीव्हलँड/अक्रॉन भागातील 350 हून अधिक अतिथींनी हजेरी लावली होती.स्थानिक/लहान व्यवसायानं बरोबरच आपल्या मंडळातील अनेक छोट्या बालगोपाल उद्योजकांनी त्यांची उद्योजकीय कौशल्ये दाखवली, पालकांना बूथमध्ये मदत केली आणि धर्मादाय संस्थांसाठी देणग्या देखील गोळा केल्या.
ह्या बरोबरच आपण तीन मराठी चित्रपट - 'आईच्या गावात मराठीत बोल', 'श्रीदेवी प्रसन्न' आणि 'अलीबाबा आणि चाळिशीतले चोर' हे सुद्धा क्लीव्लॅंड मधील रसिक प्रेक्षकांसाठी आणले.
आणि ही तर सुरुवात आहे. नथुराम गोडसे नाटक, मुलांसाठी समर कॅम्प, गणेशोत्सव, सुधीर फडके ह्यांचा कार्यक्रम, दिवाळी असे अनेक दर्जेदार कार्यक्रमांची तयारी सुरु आहेच.
ह्या सर्व कार्यक्रमांसाठी आम्हाला स्वयंसेवकांची गरज असते. तेव्हा अधिकाधिक व्यक्तींना आमच्या टीममध्ये सामील होण्यासाठी मी प्रोत्साहित करू इच्छितो.
दरवर्षी मिळणाऱ्या सभासदत्व, देणग्या, प्रायोजकत्व आणि जाहिरातींद्वारे NEOMM आर्थिकदृष्ट्या कार्यरत राहते. आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानू इच्छितो आणि त्यांच्या सातत्यपूर्ण समर्थनाची अपेक्षा करतो.
आणि सरतेशेवटी समाजासाठी प्रशंसनीय आणि अर्थपूर्ण योगदान देणारे एक प्रतिष्ठित मराठी व्यक्ती म्हणून बीएमएम संमेलनात सन्मानित झाल्याबद्दल श्री. सुदर्शन साठे यांचे हार्दिक अभिनंदन!
धन्यवाद!!
-उत्कर्ष हजरनीस
अध्यक्ष, NEOMM २०२४