top of page
मेघ स्पर्शती पर्वत शिखरे
गायी कुरणां मधुनी चरती
दूर कड्यांवर पडे दुहेरी
इंद्रधनुची मिठी निसटती ॥ १ ॥
तहान शमुनी हसते धरणी
रानझऱ्यांची अखंड खळखळ
मान मुरडुनी शुभ्र पांढरा
ध्यान लावूनी बगळा निश्चल ॥ २ ॥
हिरव्या झाडीमधे उतरते
ऊन, तांबड्या कौलांवरती
कुठे धुराच्या पातळ रेषा
निळ्यासावळ्या पडद्या पुढती ॥ ३ ॥
तुळशी पुढती अंगणामधे
रांगोळीवर नाजुक चिमटी
उभ्या तिकोनी वेलींवरती
नवरंगांची फुले उमलती ॥ ४ ॥
भिजला श्रावण सजले गोकुळ
झिम्मा खेळे पाऊस वारा
झुकली कमळे जलभाराने
कां वाजे ना मंजूळ पावा? ॥ ५ ॥
bottom of page