top of page

सुभाषिते - २

श्रीकांत लिमये

सुभाषिते  - २

सुभाषित म्हणजे चांगलं वचन, चांगलं बोलणं. हे नुसते चांगले उद्गार नाहीत. सुभाषितांमधून मानवी जीवनमूल्यांची अभिव्यक्ती, त्यांचं दर्शन होतं आणि ते सुद्धा अतिशय आकर्षक पद्धतीने. चांगलं-वाईट, उदात्त-अनुदात्त, धर्म-अधर्म, योग्यायोग्यतेचा विवेक, जीवनाचे आदर्श काय असायला हवेत? व्यवहारात जगात वागावं कसं? याचं मार्गदर्शन सुभाषितांतून होतं. नेहेमीच्या व्यवहारातली अगदी चपखल उदाहरणं सुभाषितांमधे दृष्टांतासाठी येतात. त्यामुळे कविला जे सांगायचं आहे ते सहज समजेल आणि पटेल अशा प्रकारे वाचक-श्रोत्यांपर्यंत पोचतं. सुभाषितांमधे आलेल्या उपमा, उपमानं आणि दृष्टांत पाहिले की सुभाषितकारांच्या निसर्ग तसेच सामान्य व्यवहारिक घटनांच निरक्षण किती विलक्षण होतं याची जाणीव होते.


लहानपणी शाळेत पुस्तकात वाचलेली आणि ज्येष्ठ नातेवाईक, परिचितांकडून ऐकलेली सुभाषितं आपल्यापैकी बऱ्याच जणांना थोडीफार तरी आठवत असतील. इयत्ता आठवीत संस्कृत विषयाच्या तासाला "हंसो श्वेतो बक: श्वेत: को भेदो बकहंसयो:?, नीरक्षीरविवेकेतु ह्ंसो हंसो बको बक: ॥" या किंवा "काक: कृष्ण: पिक: कृष्ण: को भेदो पिककाकयो:?, वसंतसमये प्राप्ते काक: काक: पिक: पिक: ॥" अशा एखाद्या सुभाषितापासून झालेली सुभाषितांची ओळख एखाद्या व्यक्ती बरोबरची मैत्री जशी हळुहळू वाढत जावी तशीच वाढत गेली.



सुभाषितं ही खरोखरच संस्कृतभाषेतली रत्न आहेत. हे सांगताना कुणा कविने रचलेला हा श्लोक अगदी योग्य आहे:


पृथिव्यां त्रीणी रत्नानी जलमन्नं सुभाषितम्

मूढै: पाषाण खंडेषु रत्न संज्ञा विधीयते ॥


कवि म्हणतो, पृथ्वीवर तीनच रत्ने आहेत. ती म्हणजे पाणी, अन्न आणि सुभाषित. मूर्ख लोक पाषाणाच्या तुकड्यांना, खड्यांना रत्न म्हणतात.


सुभाषितांचे श्लोक वृत्तबद्ध असल्यामुळे ते पाठ व्हायला मदत होते. काही सुभाषितं त्यांच्या वृतांच्या चालीमुळे म्हणायलाही सोपी आणि आकर्षक होतात. लहानपणी पाठ केलेली सुभाषितं आपल्या नकळत आपल्यावर होणाऱ्या सुसंस्कारंमुळे आपल्या जडणघडणीत मोलाची ठरतात. लहानपणी पाठ करताना कदाचित त्या सुभाषितांच्या अर्थाचं गांभिर्य आणि खोली आपल्याला लक्षात येत नसली तरी आपल्याला ती नंतर आयुष्यभर उपयोगी पडतात, मार्गदर्शक ठरतात.


संस्कृत साहित्यात विखुरलेली सुभाषितं खरोखर समुद्रात शिंपल्यांमधे सापडणाऱ्या पाणीदार मोत्यांसारखी आहेत. हे मोती, ही रत्ने आपला सांस्कृतिक ठेवा आहेत. अशा अनेकानेक सुभाषितांमधली मला आवडलेली अन् कदाचित त्यामुळे लक्षात राहिलेली सुभाषितं पुढे दिली आहेत. ही सगळी सुभाषिते उद्योग (उद्यमशीलता) आणि धैर्य या गुणांचे महत्व सांगणारी आहेत. नेहेमीच्या शब्दार्थ, अन्वय आणि मग अर्थ या प्रकारे मांडणी न करता, सुभाषितांचा सरळ अर्थ दिला आहे ज्यामुळे, मला वाटतं, तांत्रिक क्लिष्टतेत न सापडता अर्थ समजायला सोपा जाईल.


१. योजनानां सहस्राणि शनैर्गच्छेत् पिपिलिका

अक्रियो वैनतेतोपि पदमेकं न गच्छति ॥


पिपिलिका म्हणजे मुंगी. वैनतेय म्हणजे गरुड. एखादी मुंगी हळूहळू सहस्रावधी योजने जाते. गरुड अतिशय वेगवान आणि आकाशात उंच भरारी मारण्याचं सामर्थ्य असलेला असतो. पण तो जर क्रियाशून्य, काहीच न करणारा असेल तर तो एक पाऊलही पुढे जात नाही.


२. उद्यमेन हि सिध्यंति कार्याणि न मनोरथै:

न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा: ॥


झोपलेल्या सिंहाच्या जबड्यात जसे प्राणी स्वत:हून प्रवेश करीत नाहीत. त्यासाठी त्याला शिकारीचे परिश्रम करावे लागतात. त्याप्रमाणे सगळी कामे उद्योगशीलतेनेच पूर्ण होतात. नुसत्या मनोरथांनी कार्यसिद्ध होत नाहीत.


३. दुर्लभान्यपि कार्याणि सिध्यन्ति प्रोद्यमेन हि

शिलापि तनुतां याति प्रपातेनार्णसो मुहु: ॥


जशा मोठ्या शिळासुद्धा त्यांवर धबधब्याच्या सतत पडणाऱ्या धारेमुळे हळूहळू झिजतात त्याप्रमाणे यश मिळवायला कठीण असलेली कामेसुद्धा प्रकर्षाने केलेल्या उद्योगानेच पूर्ण होतात.


४. उद्यम: साहसं धैर्यं बलं बुधि: पराक्रम:

षडेते यस्य तिष्ठन्ति तस्य देवोऽपि श कित: ॥


ज्याच्या जवळ उद्यमशीलता, साहस, धैर्य, बळ (शक्ती), बुद्धिमत्ता आणि पराक्रम या सहा गोष्टी आहेत त्याचं देव तरी काय वाकडं करणार? लक्षात घ्या की या गुणांमधे "उद्यमशीलता" हा पहिला गुण आहे. कारण उद्यमशीलता नसेल तर इतर सगळे गुण असतानाही कार्य पूर्ण होणं सोडाच, सुरूही होणार नाही.


५. धीरा: शोकं तरिष्यन्ति लभते सिद्धिमुत्तमम्

धीरै: संप्राप्ते लक्ष्मी: धैर्यं सर्वत्र साधनम् ॥


धैर्यवान मनुष्य अपयशाने किंवा दु:खामुळे आलेल्या शोकातून सावरतात आणि उत्तम यश प्राप्त करतात. धैर्यवानांना लक्ष्मी प्राप्त होते. म्हणून धैर्य हेच आपल्या सगळ्या उद्दिष्टांची पूर्ती करण्याचं साधन आहे.


६. तद् धैर्यं अवलम्बस्व तां गवेषय च प्रियाम्

अप्राप्यं नाम नेहास्ति धीरस्य व्यवसायिन: ॥


तेव्हा धैर्य धर आणि त्या (तुझ्या) प्रियतमेचा शोध घे. (कारण) या जगात उद्योगी आणि धैर्यवान मनुष्याला अप्राप्य असे काहीही नाही. (पत्नीचे अपहरण झाल्याने शोकमग्न, हताश झालेल्या हरिस्वामीला त्याच्या आप्त आणि सुहृदांनी केलेला उपदेश.)


७. उद्योगे नास्ति दारिद्र्यं जपतोनास्ति पातकम्

मौनेन कलहं नास्ति नास्ति जागरिते भयम् ॥


उद्योगी मनुष्याला दारिद्र्य नसते. जप करणाऱ्याला पाप नसते. मौनाने भांडण होत नाही. जागं आलेल्याला भीती नसते. (म्हणून मनुष्याने उद्यमशील असावे.)


८. रत्नैर्महार्हैस्तुतुषुर्न देवा: न भेजिरे भीमविषेण भीतम्

सुधां विना न प्रययुर्विरामं न निश्चितार्थाद्विरमन्ति धीरा: ॥


समुद्रमंथन करताना मिळालेल्या लक्ष्मी, कौस्तुभमणी, प्राजक्ताचा वृक्ष, अप्सरा रंभा, चंद्र यांसारख्या विविध रत्नांमुळे देव लोभावले अथवा समाधान पावले नाहीत. तसेच त्यातून उत्पन्न झालेल्या हलाहल विषामुळे ते घाबरलेही नाहीत.अमृतप्राप्ती होईपर्यंत त्यांनी विश्रांती न घेता अथक प्रयत्न सोडले नाहीत. खरोखर, धैर्यवान लोक ठरवलेलं ध्येय गाठल्या शिवाय, ठरवलेलं कार्य पूर्ण होई पर्यंत विश्रांती घेत नाहीत.

bottom of page